तलावात पोहणे ठरले जीवघेणे; गाळात अडकून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

खामगाव : उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळवण्यासाठी तलावात पोहायला उतरलेल्या १३ वर्षीय मुलाचा गाळात अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे शिवारातील फादर कॉलनी तलावात रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, जयपूर लांडे येथील समर्थ मंगलसिंग पवार (वय १३) हा रविवारी सकाळी शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात गेला होता. चराईदरम्यान त्याला तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने फादर कॉलनी तलावात उडी घेतली. मात्र, पोहत असताना तलावातील खोल खड्ड्यातील गाळात तो अडकला. त्यामुळे तो पाण्यातच बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला तातडीने बाहेर काढून खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी निशांत प्रतापसिंग पवार (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मधुकर पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!