रायपूर : शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंप चोरी करून विक्रीसाठी फिरणाऱ्या तिघांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून तब्बल ४५ हजार रुपये किमतीचे दोन मोटारपंप जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी चोरीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीतून काहीसा दिलासा मिळाला आहे.
चिखली तालुक्यातील आंधई शिवारात जानेवारी महिन्यात शेतकरी बळीराम सखाराम बहाटे यांच्या धरणाजवळील शेतातून ७.५ एच.पी. क्षमतेचा मोटारपंप चोरीला गेला होता. त्याचवेळी शेजारील शेतकरी प्रल्हाद माणिकराव मोरे यांच्या विहिरीतील ५ एच.पी. क्षमतेचे दोन मोटारपंपही अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी बीएनएस २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. ६ मे रोजी आरोपी चोरीचे मोटारपंप विक्रीसाठी अमडापूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी अमडापूर बसस्थानक परिसरात सापळा रचून अतुल सौभागे, उमेश शेळके आणि आदेश चौथे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटारपंप आढळून आले. कसून चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७.५ एच.पी. व ५ एच.पी. क्षमतेचे मोटारपंप असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना अमडापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.