Headlines

महामार्गावर अपघातानंतर कार-दुचाकी पेटली; तिघे जखमी, चिमुकल्यासह कुटुंबाचा थरारातून बचाव

मलकापूर :- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी-धानोरा दरम्यान कार आणि दुचाकीची धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून काही काळ घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील तुषार पाटील (वय ३१) आणि रुचिता पाटील (वय २९) हे दाम्पत्य आपल्या १० महिन्यांच्या बाळासह नागपूरहून परतत होते. त्याचवेळी पांडुरंग वानखेडे (वय ४१, रा. वडनेर भोलजी) हे दुचाकीने रस्ता ओलांडत असताना कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.
अपघातानंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने दाम्पत्याने बाळासह वेळेत वाहनाबाहेर पडत जीव वाचवला, तर दुचाकीस्वार दूर फेकला गेल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघातात वाहनांना लागलेल्या आगीमुळे काही काळ रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!