मलकापूर :- मलकापूर व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसासोबत गारांचा मारा झाल्याने मका, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वादळ आणि गारांच्या तडाख्याने आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच विविध अडचणींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले पीकही नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळत आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या लग्नसराईवरही या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पापड, कुरडई, सांडोळी यांसारख्या पदार्थांच्या तयारीत अडथळे निर्माण झाले आहेत. हवामानातील अनिश्चिततेमुळे पारंपरिक उपक्रमांवरही मर्यादा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील काळात आणखी संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.