बुलढाणा : – मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली असून, त्या देशांत वास्तव्यास असलेल्या किंवा अडकले असल्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, संबंधित नागरिकांची नावे, पत्ते व संपर्क तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
भारत सरकारच्या दूतावासांकडून संबंधित देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बहरीन, ओमान (मस्कत), जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे असलेल्या भारतीयांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक हालचाली टाळून स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासांच्या सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील काही नागरिक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त या देशांत गेलेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या हेल्पलाइन क्रमांकांचा वापर करण्याचेही सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.