चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांत भीषण तणाव; महिला पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप, ३७ जणांवर गुन्हे तर २१ अटकेत

 

लोणार :- तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला असून गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. या प्रकरणी पोलिसांनी ३७ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून २१ जणांना अटक केली आहे. गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी पुतळा उभारला होता. तो अन्य ठिकाणी हलवावा की नाही, या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले. शुक्रवारी सायंकाळी हा वाद चिघळून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण व विनयभंग झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वातावरण अधिक तापले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मेहकर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली व परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन अल्पवयीन मुलांबाबत गैरवर्तन व अपहरणाच्या प्रयत्नाची चर्चा झाली असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पीडित महिलेची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली तसेच २७ तारखेपर्यंत सर्व संबंधितांना अटक करण्याचा इशारा दिला.
घटनेची गांभीर्य लक्षात घेता अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे व जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासनाकडून पुढील काही दिवस विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!