बुलढाणा :- शहरातील जयस्वाल चौक परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सागर उर्फ पप्पू जाधव (वय ३८) यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सोनू जाधव (रा. भीलवाडा) व त्याचा साथीदार आनंद काकफळे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर सागर जाधव हे रात्री उशिरा घरी परतत असताना जयस्वाल चौकात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांच्या पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याने ते जागीच कोसळले. नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात वैयक्तिक कारणांमधून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलेशी असलेल्या संबंधांवरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाची गती वाढवत संशयितांचा शोध घेत दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.