मलकापूर :- शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील गल्लोगल्ली डासांचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेकडून डास नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः धूर फवारणी होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती लक्षात घेता, शहरातील सर्व भागात तातडीने धूर फवारणी करण्यात यावी तसेच स्वच्छता मोहिम राबवून डासांची उत्पत्ती रोखावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.