Headlines

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; जळगांव जामोद येथील घटना

जळगांव जामोद : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या सुनगाव वेस भागातील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुनगाव वेस येथील शेतकरी गोपाल लक्ष्मण भड (वय ५१) यांनी १ एप्रिल रोजी स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या मेमोवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव सुनगाव येथे आणण्यात आले. रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत शेतकऱ्याकडे चालठाणा बु. शिवारात सुमारे ३ एकर शेती असून सततची नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे ते त्रस्त होते. तसेच त्यांच्या नावावर जामोद येथील एका बँकेचे सुमारे १ लाख ६ हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. मृत गोपाल भड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!