मला पैशांसाठी त्रास देत आहेत; चिट्ठीत उल्लेख, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या!

 

खामगाव : – तालुक्यातील वाडी येथे सावकारी व्यवहार व शेती संदर्भातील आर्थिक वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शेतकरी भास्कर लक्ष्मण तायडे (रा. वाडी) यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली असून त्यात आर्थिक व्यवहारांमुळे होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तिघांची नावे नमूद करून आपल्याला सातत्याने पैशांसाठी त्रास दिला जात असल्याचे त्यांनी लिहिल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेती व्यवहारात रक्कम परत केल्यानंतरही जमीन आपल्या नावावर करून देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही, असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. उलट अधिक पैशांची मागणी करून दबाव टाकला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुमारे १ लाख ४९ हजार रुपये अदा केल्यानंतरही व्याजासह आणखी दोन लाख रुपयांची मागणी सुरू असल्याचेही नमूद असल्याची माहिती आहे.
या संदर्भात गजानन तुळशिराम वाघोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोमेश्वर नामदेव दामोदर (रा. वाडी), प्रवीण संतोषराव खारोडे उर्फ निखिल देशमुख आणि विजय त्र्यंबक इंगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!