Headlines

भामट्यांनी देवाचे घरही सोडले नाही! बालाजी मंदिरातील सव्वा लाखांचे चांदीचे दागिने लंपास

संग्रामपूर : “जिथे भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात, त्या देवळालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.” तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे गावात खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वानखेड येथील बालाजी मंदिर उघडे असताना अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून देवस्थानातील चांदीचे दागिने लंपास केले. चोरी झालेल्या ऐवजात सुमारे ४०० ग्रॅम वजनाच्या रामदेव बाबांच्या चांदीच्या पादुका, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे छत्र आणि ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा असा एकूण सुमारे ५५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत, देवस्थानांची सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी वानखेड येथील रतनलाल सुखदेव चांडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!