Headlines

हरिओम वधु वर मेळाव्याचे दिवंगत अध्यक्ष स्व. किरण दुसाने यांना विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे जाहीर करण्यात आलेल्या कृति आराखडा संदर्भात सोनारवाडा, नाशिक येथील सहविचार बैठक समर्पित

नाशिक : – येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात अर्थात सोनारवाड्या मध्ये मंगळवार, दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता *सकल भारतीय सोनार समाज संघटन* या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे तसेच सोनार समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून कशी करता येईल, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठातर्फे विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृति आराखड्या संदर्भात सहविचार बैठक पार पडली.

नाशिक येथील हरिओम सांस्कृतिक संस्था वधु वर परिचय मेळाव्याचे दिवंगत अध्यक्ष स्व. श्री. किरण जगन्नाथ दुसाने

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केले. सदर सहविचार बैठक ही नाशिक येथील हरिओम सांस्कृतिक वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्थेचे दिवंगत अध्यक्ष स्व. श्री. किरण जगन्नाथ दुसाने यांना समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. समिती निहाय कृति आराखडा सादर करण्याचा उद्देश हा नवीन वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था किंवा नवीन सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्था स्थापन करणे हा नाही, तर सोनार समाज संस्थांशी निगडित शाखीय किंवा सर्व शाखीय सोनार वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था आणि सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्था यांना पूरक सहकार्य करण्याचा आहे, असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी सांगितले.
प्रारंभी व्यासपीठावर असलेल्या खुर्चीवरील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस भारतीय सुवर्णकार समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भास्करराव मैंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुष्पहार अर्पण करतेवेळी समवेत ज्येष्ठ सोनार समाजसेविका श्रीमती सुरेखाताई पोतदार, श्रीमती सीमाताई माळवे, अहिर सुवर्णकार समाज संस्था, नाशिक चे अध्यक्ष श्री. राजेंद्र दिंडोरकर, सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर केवळ आणि केवळ सोनार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज प्रतिमा रूपाने उपस्थित होते.
प्रास्ताविकानंतर श्री. राजेंद्र दिंडोरकर यांनी कृति आराखडा संदर्भात विचार मांडताना सांगितले की, नवीन वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था किंवा नवीन सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्था स्थापन करणार असाल, तर त्यास मी सहमत नाही. कारण सोनार समाज संस्थांशी निगडित विविध ठिकाणी वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था आणि सामुदायिक विवाहसोहळा आयोजक कार्यरत आहेत. त्यात अजून नव्याने एका संस्थेची भर नको. आहेत त्या वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था आणि सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्था यांना सहकार्य करावे, असे सुचवू इच्छितो. असे असले, तरीही या कृति आराखड्यातील समुपदेशन विषयक ज्या समित्यांचा नामोल्लेख केला आहे, त्यावरून *समुपदेशन* संदर्भात आपण जे कार्य करत आहात किंवा करू पाहत आहात, त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. समुपदेशनासाठी, समाजप्रबोधनासाठी सोनारवाडा वेळोवेळी आपणास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, याबद्दल निश्चित असावे, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. (डॉ.) अचलाताई दहिवाळ यांनी *संस्कार, समज आणि संवाद* हे *शून्य घटस्फोटाचे सूत्र* आहे, तर *मजबूत कुटुंब आणि शांत समाज ही मानवधर्माची खरी ओळख आहे,* असे प्रतिपादन केले.

यावेळी त्या म्हणाल्या की,
आजचा समाज वेगाने बदलत आहे. या बदलांमध्ये विवाहसंस्थादेखील अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आर्थिक ताण, वैचारिक मतभेद, सामाजिक दबाव आणि कुटुंबातील संवादाचा अभाव ही त्यामागील काही प्रमुख कारणे आहेत.
परंतु या सर्व कारणांचा सखोल विचार केला, तर असे लक्षात येते की बहुतेक समस्यांच्या मुळाशी अहंकार, असहिष्णुता आणि संवादाचा अभाव ही तीन कारणे असतात. जेव्हा कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना समजून घेण्याऐवजी स्वतःच्या मतालाच सर्वोच्च मानतात, तेव्हा लहान-लहान मतभेद मोठ्या वादांमध्ये बदलतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
पूर्वीच्या काळात विवाहानंतर स्त्रीची भूमिका प्रामुख्याने घरापुरती मर्यादित असायची. घराची जबाबदारी सांभाळणे आणि कुटुंबाची काळजी घेणे हेच तिचे मुख्य कार्य असे. परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आजची स्त्री शिक्षित, आत्मनिर्भर आणि समाजातील अनेक क्षेत्रांत सक्रिय आहे. ती घर आणि बाहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते.
अशा परिस्थितीत तिच्या भावना, तिचे श्रम आणि तिचा संघर्ष समजून घेणे हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. पती-पत्नीचे नाते हे स्पर्धेचे नसून सहकार्याचे असावे. जेव्हा दोघेही एकमेकांचे सहकारी बनून जीवनातील जबाबदाऱ्या वाटून घेतात, तेव्हा कुटुंबाचा पाया अधिक मजबूत होतो.
कुटुंब केवळ पती-पत्नीपुरते मर्यादित नसते. त्यामध्ये आई-वडील, भाऊ-बहिणी, सासू-सासरे, दीर-नणंद आणि इतर नातीही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कुटुंब सुखी आणि संस्कारित ठेवण्यासाठी प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
अनेक वेळा विवाहानंतर माहेर किंवा सासरच्या लोकांचा अतिरेक किंवा अनावश्यक हस्तक्षेपही वाद निर्माण करतो. म्हणून पती-पत्नीला त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेण्याची मोकळीक देणे आवश्यक आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना मार्गदर्शन करावे, परंतु दबाव टाकू नये.
समाजाचीही यात महत्त्वाची भूमिका असते. एखाद्या कुटुंबात मतभेद निर्माण झाले, तर समाजातील लोकांनी केवळ प्रेक्षक बनून राहू नये. शक्य असल्यास त्यांनी समजुतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा.
खरे पाहता मनुष्याचा सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवधर्म. मानवधर्म म्हणजे प्रेम करणे, एकमेकांना समजून घेणे, चुका माफ करणे आणि सुधारण्याची संधी देणे. ज्या प्रकारे पालक आपल्या मुलांच्या चुका समजून घेतात आणि त्यांना घराबाहेर काढत नाहीत, त्याचप्रमाणे कुटुंबात येणाऱ्या सून किंवा जावयालाही सन्मान आणि प्रेमाने स्वीकारले पाहिजे.
जर प्रत्येक कुटुंबाने संस्कार, समज आणि संवाद ही तीन मूल्ये आपल्या जीवनात स्वीकारली, तर अनेक कौटुंबिक वाद आपोआप संपुष्टात येऊ शकतात आणि घटस्फोटाची वेळ येणार नाही.
एकंदरीत, थोडक्यात असे सांगता येईल की, *मजबूत समाजाची पायाभरणी मजबूत कुटुंबांवरच उभी असते. जेव्हा कुटुंबात प्रेम, संयम आणि परस्पर सन्मान असतो, तेव्हा समाजही अधिक शांत आणि संतुलित बनतो.म्हणून प्रत्येक कुटुंबाने संवाद आणि समजूतदारपणाची संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जिथे संस्कार, समज आणि संवाद असतात, तिथे नाती तुटत नाहीत—तर अधिक दृढ बनतात.*

सहविचार बैठकीत आपले विचार मांडताना नाशिक येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच भारतीय सुवर्णकार समाज संस्था (नागपूर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भास्करराव मैंद म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक श्री. मिलिंदकुमार सोनार हे आपल्या समाजातील विविध समस्यांच्या अनुषंगाने सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करत आहेत. दिनांक १ डिसेंबर २०२४ ते ७ डिसेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय सोनार समाज जागृती सप्ताह आयोजित करण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून सर्व शाखीय सोनार समाजाला संघटित होण्याची अधिक प्रेरणा मिळेल. या आवाहनाला संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. डोंगराळे येथील दिवंगत अत्याच्यारपीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये मूक मोर्चे, आक्रोश मोर्चे काढण्यात येत होते. याची दखल घेऊन नाशिकमधील तोरणानगर येथील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज मंदिरात सहविचार बैठकीसाठी आम्ही निवडक समाज बांधव जमलो असताना मिलिंदकुमार सोनार यांनी प्रस्ताव मांडला की, नाशिकमध्ये देखील मूक मोर्चा काढण्यात यावा. या निमित्ताने सोनार समाज संघटित आणि सजग असल्याचा प्रत्यय आणून देता येईल.
त्यावर आम्ही चर्चा करून नाशिक मधील सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून मूक मोर्चा काढण्यात यावा, यासाठी प्रयत्न करता येईल काय, अशी विचारणा केली असता, सर्वांनीच मूक मोर्चा काढण्यास दुजोरा दिला. सराफ बाजार चौकापासून रविवार कारंजा, महात्मा गांधी मार्ग, अशोकस्तंभ सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार असा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ सोनार समाजातीलच नव्हे, तर अन्य समाजातील नागरिकदेखील प्रेरित होऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. लक्षणीय असा हा मूक मोर्चा होता, याची आठवण तुम्हा सर्वांना करून देत आहे. सोनार समाजातील विवाहनिश्चिती विषयक समस्या, प्रौढ उपवर मुला मुलींची वाढती संख्या, कुटुबकलह आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण या समस्यांचा साकल्याने विचार करून मिलिंदकुमार सोनार यांनी विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हा अकरा समित्यांचा कृति आराखडा तयार केला आहे. या कृति आराखड्याचे आपण सर्व मिळून स्वागत करूया. या कृति आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास या समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच होऊ शकते. त्यासाठी सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी, पालकांची इच्छाशक्ती असावी, असे प्रतिपादनदेखील श्री. मैंद यावेळी केले.

घोटी, जिल्हा नाशिक येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक, तसेच अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बाळकृष्ण फाकटकर यांनी देखील आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले की, व्हॉट्सॲप समूहाद्वारे समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या पोस्ट्स वेळोवेळी शेअर करत संस्थापक श्री. मिलिंदकुमार सोनार यांनी सकल भारतीय सोनार समाज संघटन, समाजप्रबोधन, समुपदेशन, विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडा जाहीर करून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अशा सहविचार बैठकांना विविध सोनार समाज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या बैठकांचे, समाजप्रबोधन आणि समुपदेशन, तसेच कृति आराखड्याचे महत्त्व अधिकाधिक सोनार समाजघटकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही, खेदजनक बाब आहे. कृति आराखडा जाहीर झाला. पुणे, अमळनेर, कोपरगाव, नाशिकरोड येथे, सिडकोतील तोरणानगर येथील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज मंदिरात झालेली आणि आजची नाशिक येथील सोनारवाड्यातील सहविचार बैठक धरून एकूण सात सहविचार बैठका झाल्या. या बैठकांचे स्वरूप खर्चिक, उत्सवी, दिमाखदार, पदनियुक्तीच्या पोस्टरबाजी करणारे नव्हते, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे. सर्वसामान्य सोनार समाजघटकांना सकल भारतीय सोनार समाज संघटन या व्यासपीठाकडून भरीव असे कार्य व्हावे, अशी आशा वाटते. आता फक्त आपल्या समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून करण्यासाठी ठोस कृतीची, कृति आराखड्याच्या काटेकोर अंमलबजावणीची अनिवार्य गरज निर्माण झाली आहे. या कार्यात मी स्वतः तसेच आमची संस्था नेहमी सक्रिय सहभाग घेईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

यावेळी बोधलेनगर (नाशिक) येथील प्रख्यात विचारवंत श्री. राजाभाऊ सोनार (विसपुते) म्हणाले,
*आपल्या समाजात घटस्फोट प्रमाणवाढीची विविध व अनेक कारणे आहेत. यात आपण सारासार विचार व अभ्यास केला, तर पत्रिका पाहणारे जे पालक आहेत, त्यांच्या कुटुंबात विवाहित मुला मुलींचे घटस्फोट जास्त प्रमाणात आढळत आहेत.*

*पत्रिका, कुंडली पहाणारे माता पिता आपल्या मुला मुलीला जन्म देऊन, उच्चशिक्षण देऊन ते लग्नानंतर कुटूंबाची जबाबदारी पेलवू शकत नाहीत, अशी ज्यांची पुसटशी धारणा व कल्पना असते, असे लोक हलक्या कानाचे असून, पत्रिका पाहणारी तिसरी व्यक्ती त्या उपवर मुला मुलीला प्रत्यक्ष न पाहता, न जाणता, त्यांचे शिक्षण, उंची, कुळ रंग, रूप, स्वभाव यांची माहिती नसतानादेखील पत्रिका पाहून वर वधू यांचा विवाह करू नका, किंवा विवाह करा, असे सांगतो. येथेच आपला समाज अंधश्रद्धेकडे जाऊन भविष्यात घटस्फोटाचे बीज रूजवतो. पत्रिका पाहणाऱ्यांच्या कुटुंबात घटस्फोट म्हणजेच फारकतीचे प्रमाण सध्या वाढले आहे. ही आपल्या समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. खेदजनक आहे.*

*पूर्वी व काही प्रमाणात समाजातील लोक आजही एकमेंकांना भेटतात. बोलत, चर्चा करत. कोण मुलगा, मुलगी लग्नाची आहे, यांच्यामार्फत मध्यस्थीची भूमिका करून आजही विवाह होत आहेत. अशा विवाहात शक्यतो घटस्फोट होत नाहीत. झाले, तरी त्यांचे सरासरी प्रमाण कमी आहे.*

*आज समाज आळशी व बेभरोसे होत असल्याने घरबसल्या व्हॉट्सॲप दररोज पाच पन्नास अनुरूप परिचय पत्र आणि फोटो पहावयास मिळतात. यामुळे अपेक्षा व अती महत्वाकांक्षा वाढली; परंतू योग्य वेळेत, योग्य वयात निर्णय घेण्यात पालक म्हणवणारा बहुतांश समाजघटक अकार्यक्षम झाला, निकामी होत आहे. मग अखेर सुलभ व योग्य वेळ स्थळ भराभर निघुन जात असताना कुठेतरी घरातील माता पिता बंधू भगिनीत अप्रत्यक्षरीत्या वैचारिक तट पडल्यानंतर विवाहनिश्चितीचा निर्णय घेतला जातो. येथेच भविष्यातील घटस्फोट होण्याची चिन्ह आपण तयार करतो.*

*समाजातील लग्न विवाह जोडण्यात आजच्या मुल मुली चूक आहे की त्यांचे माता पिता चूक, हे सांगणे कठीण झाले आहे. याला विविध कारणे असली, तरी मूळ मुद्दा सामाजिक परिपक्वतेचा विषय येतो. ज्या परिवारात सामाजिक, वैचारिक बैठक मजबूत, तेथे बहुतांशी घटस्फोट कमी होतात. ज्या परिवारात सामाजिक नातेसंबंधी संपर्क नाही, विचार, कृती नाही; तेथे घटस्फोट हमखास होतात.*

*आजचे माता पिता, वर वधू स्थळाबाबत स्पष्ट उत्तर व निर्णय देण्यास विलंब लावतात. बहुतांश लोक उत्तरच देत नाहीत. याकारणी समाजात संबधीत मुला व मुलीच्या विवाहाबाबत नकारात्मकता जलद पसरली जाते. ते लोक ‘बरोबर वाटत नाही,’ बस एवढ्याच शब्दात प्रतिक्रिया देतात. आपला समाज वरील प्रक्रियेत भर टाकून अजून स्थळाचे पहाणे व उत्तर देणे टाळून या नकारात्मकतेच्या रांगेतील संख्या वाढवित जातो व पुढील वैवाहीक जीवनातील फारकतीची वाट रूंद करतो.*

*समाज वाईट नाही, समाजाची व्यक्तीगत विचारधारा वाईट होत आहे. तिचे सामाजिक, कौटुंबिक विचारमंथन होणे गरजेचे आहे,* असे आवाहनही श्री. राजाभाऊ सोनार यांनी केले.

ज्येष्ठ सोनार समाजसेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेच्या पदाधिकारी श्रीमती सुरेखाताई पोतदार यांनी सांगितले की, सोनार समाजातील विवाहनिश्चितीची समस्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे अत्यंत विदारक आणि कटू वर्तमान समाजवास्तव आहे. या समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून व्हावी, यासाठी समाजधुरिणांनी तसेच सर्व शाखीय सोनार समाजघटकांनी इच्छाशक्ती दाखवून सर्वंकष प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. या समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून करण्यासाठी या कृति आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करणे ही काळाची अनिवार्य गरज आहे. धोक्यात आलेली भारतीय विवाहसंस्था आणि अस्तंगत होऊ पाहणारी कुटुंबसंस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी भारतात सर्वप्रथम सर्व शाखीय सोनार समाजाने या कृति आराखड्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनदेखील श्रीमती सुरेखाताई पोतदार यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ सोनार समाजसेवक, प्रख्यात कुटुंबप्रबोधक तसेच कुटुंब प्रबोधन समिती समन्वयक श्री. कृष्णा बबनराव थोरात यांनी कृती आराखड्यातील *कुटुंब प्रबोधन समिती* चे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, समाजसुधारणा ही सर्वप्रथम कुटुंबापासून होत असते. प्रत्येक कुटुंबप्रमुख व मातृशक्तीने उत्तम कुटुंब कसे करता येईल, यासाठी इच्छाशक्ती दर्शविली पाहिजे. आम्ही कुटुंब प्रबोधन समितीच्या माध्यमातून कुटुंबास कसे सर्व प्रकारे सक्षम करता येईल, याचे समुपदेशन करण्यास तत्पर आहोत. आपल्या समाजातील कुटुंबाशी निगडित विविध समस्यांसंदर्भात आपले कुटुंबच सक्षम करणे महत्वाचे आहे.
मिलिंदकुमार सोनार यांनी वर्तमान समाजवास्तव, समाजाच्या विविध समस्यांचे सखोल चिंतन करून हा कृति आराखडा तयार केल्याचे प्रत्ययास येते. सोनार समाजाशी संबंधित विविध व्हॉट्सॲप समूहांमध्ये ते समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या पोस्ट्स शेअर करत असतात. समूहात समाविष्ट असलेल्या प्रत्येक सदस्याने, त्यांच्या पोस्ट्स काळजीपूर्वक वाचून आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. गुड मॉर्निंग, गुड नाईट, तसेच वाढदिवस शुभेच्छा, राजकीय आणि अन्य सोशल मीडियावरून शेअर किंवा फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या भरमसाट पोस्ट्स यांच्यामुळे समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या पोस्ट्स नजरेआड होत असतात.
खरोखरच हा कृति आराखडा काटेकोरपणे अमलात आणल्यास आपल्या कुटुंबातील या समस्या सहजगत्या सोडविता येऊ शकतात, असा विश्वास वाटतो, असा आशावाद देखील ॲड. विसपुते यांनी व्यक्त केला.

सहविचार बैठकीत सहभाग नोंदविताना ज्येष्ठ सोनार समाजसेवक, प्रख्यात कुटुंबप्रबोधक तसेच कुटुंब प्रबोधन समिती समन्वयक श्री. कृष्णा बबनराव थोरात यांनी कृती आराखड्यातील *कुटुंब प्रबोधन समिती* चे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, समाजसुधारणा ही सर्वप्रथम कुटुंबापासून होत असते. प्रत्येक कुटुंबप्रमुख व मातृशक्तीने उत्तम कुटुंब कसे करता येईल, यासाठी इच्छाशक्ती दर्शविली पाहिजे. आम्ही कुटुंब प्रबोधन समितीच्या माध्यमातून कुटुंबास कसे सर्व प्रकारे सक्षम करता येईल, याचे समुपदेशन करण्यास तत्पर आहोत. आपल्या समाजातील कुटुंबाशी निगडित विविध समस्यांसंदर्भात आपले कुटुंबच सक्षम करणे महत्वाचे आहे.
मिलिंदकुमार सोनार यांनी वर्तमान समाजवास्तव, समाजाच्या विविध समस्यांचे सखोल चिंतन करून हा कृति आराखडा तयार केल्याचे प्रत्ययास येते. सोनार समाजाशी संबंधित विविध व्हॉट्सॲप समूहांमध्ये ते समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या पोस्ट्स शेअर करत असतात. समूहात समाविष्ट असलेल्या प्रत्येक सदस्याने, त्यांच्या पोस्ट्स काळजीपूर्वक वाचून आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. गुड मॉर्निंग, गुड नाईट, तसेच वाढदिवस शुभेच्छा, राजकीय आणि अन्य सोशल मीडियावरून शेअर किंवा फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या भरमसाट पोस्ट्स यांच्यामुळे समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या पोस्ट्स नजरेआड होत असतात.
खरोखरच हा कृति आराखडा काटेकोरपणे अमलात आणल्यास आपल्या कुटुंबातील या समस्या सहजगत्या सोडविता येऊ शकतात, असा विश्वास वाटतो, असेदेखील श्री. थोरात म्हणाले.

या सहविचार बैठकीत उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी गुजरातमधील गांधीनगर येथील श्री. वसंत जयदेवशेट दुसाने, सुरत येथील श्री. काशिनाथ शांतारामशेट बिरारी, तसेच अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार महाराष्ट्र राज्य प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बाळकृष्ण फाकटकर, सचिव श्री. दिलीप रामकृष्ण घोडेकर, श्री. रवींद्र प्रल्हादजी खोलमकर, ॲड. (डॉ.) अचलाताई दहिवाळ, ॲड. पल्लवी आहेर, ज्येष्ठ सोनार समाजसेविका श्रीमती सुरेखाताई पोतदार, श्रीमती सीमाताई माळवे, ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते, ॲड. पराग जाधव, बोधलेनगर येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप जगन्नाथ खरोटे, राजाभाऊ सोनार (विसपुते), श्री. प्रवीण पोतदार, श्री. दिलीप नामदेवशेट देवरे, श्री. किरण पंढरीनाथ जाधव, मालेगाव येथील श्री. महेश वसंतराव कोठलीकर, बाळूशेट शंकरशेट बागुल, ज्येष्ठ सोनार समाजसेवक श्री. अरविंद मार्तंडशेट मैंद, श्री. प्रकाश नामदेवशेट दुसाने, सौ. उषा प्रकाश दुसाने, बाळासाहेब नारायण सोनगिरकर, माळवी सोनार समाज संस्थेचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र विठ्ठलराव शेरेकर, श्री. प्रमोद श्रावण जाधव, सकल भारतीय सोनार समाज संघटन चे सहसंस्थापक तसेच युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शांताराम गोपाळशेट दुसाने आदी उपस्थित होते.
सकल भारतीय सोनार समाज संघटन चे सहसंस्थापक, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच नाशिकरोड देवळाली अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त श्री. शांताराम गोपाळशेट दुसाने यांनी समारोपप्रसंगी उपस्थित समाज बांधव आणि भगिनी यांचे तसेच सहविचार बैठकीसाठी सोनारवाडा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल नाशिक येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र दिंडोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचेदेखील आभार मानत भावी काळात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!