मलकापूर :- छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २० फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे तसेच प्रदीप कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. तसेच पोवाडा, गीतगायन आणि शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शिक्षकांनी महाराजांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि आदर्श नेतृत्वगुण यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पांडे यांनी केले, तर कांचन राणे यांनी आभार प्रदर्शन केले. “स्वराज्याची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे कार्य करण्याचा” संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
