नांदुरा : शहरातील जुन्या बसस्टॉप परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाची पैशांनी भरलेली लेदर बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेत १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम, चेकबुक व पासबुक असा मुद्देमाल चोरीला गेला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील पलसोडा येथील दिनेशसिंह हिंमतसिंह राजपूत (वय ६३) हे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दीड वाजता सुनगाव येथील नातेवाईक चैनसिंग राजपूत यांच्यासह जुन्या बसस्टॉप परिसरातील दीपक रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे लेदरची बॅग होती. या बॅगमध्ये १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम, चेकबुक व पासबुक ठेवलेले होते. रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर त्यांनी बॅग टेबलजवळ बाजूला ठेवली होती. चहा पिण्यात गुंग असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून ही बॅग चोरून नेली. काही वेळानंतर पैसे देण्यासाठी उठल्यावर बॅग दिसून न आल्याने त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली; मात्र बॅगचा कोणताही मागमूस लागला नाही. यानंतर दिनेशसिंह राजपूत यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख मिलिंद जवंजाळ करीत आहे
