वृत्तसेवा
लोणार : प्रतिनिधी प्रेम प्रकरणात अडसर ठरू लागल्याने प्रेयसीने आपल्या आधीच्या प्रियकराची गळा आवळून हत्या केली. यासाठी तिने तिच्या दुसऱ्या प्रियकराची मदत घेतली. लोणार सरोवराच्या परिसरातील अभयारण्यात ही घटना घडली.
या धक्कादायक घटनेत प्रियकराचा मृतदेह जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला. पोलिसांच्या सखोल तपास अंती आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृत प्रियकर आणि आरोपी परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन रोडगे (वय २८, रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) असे मृताचे नाव आहे. अर्चना विठ्ठल सरोदे (२९, रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) व माऊली डुकरे (वय २४, खडूळा, ता. पाथरी, जि. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. २ ऑगस्टपासून अर्जुन गावातून बेपत्ता होता. त्यामुळे तशी तक्रार अर्जुनच्या वडिलांनी पोलीसांत दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना अर्जुनचे गावातील अर्चना सरोदे हिच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अर्चनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अर्चनाने अखेर अर्जुनचा खून केल्याची कबुली दिली. अर्जुन आणि अर्चनाचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र, नंतर तिचे दुसऱ्याशी प्रेम संबंध जुळले. माऊली डुकरे याच्याशी प्रेमप्रकरण सुरू झाल्याने अडथळा ठरणाऱ्या जुना प्रेमी असणाऱ्या अर्जुनला कसे संपवायचे याचा विचार अर्चना करत होती. २ ऑगस्ट रोजी अर्चना आणि अर्जुन स्कुटीने फिरण्यासाठी लोणार सरोवर येथे आले. दोघे लोणार सरोवरात फिरायला गेले. मात्र, माऊली डुकरे
आधीपासूनच दबा धरुन होता. सरोवरकडे जाणाऱ्या दर्गा रोडने असलेल्या चिंचेच्या झाडाखाली अर्चना आणि अर्जुन बसले. त्यावेळी आधीच ठरल्याप्रमाणे दबा धरून बसलेल्या माऊली डुकरे आणि अर्चना यांनी अर्जुनचा गळा आवळला. त्यानंतर अर्जुनचा मृतदेह जंगलातील घनदाट जाळीत फेकून देण्यात आला. अर्चना आणि माऊली डुकरे सोबत गावाकडे निघून गेले.
अर्चनाने ही कबुली दिल्यावर ५ ऑगस्टच्या रात्री पोलीस अर्चनाला घेऊन लोणार सरोवरातील अभयारण्यात आले. मृतदेह कुठे फेकला होता याची माहिती घेतली. शोधाशोध केल्यानंतर अर्जुनचा मृतदेह सापडला. सरोवरातून मृतदेह वर आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आता माऊली डुकरे यालाही अटक केली आहे.