मलकापूर बस स्थानकासमोरचा हायमास्ट पोल वाहतुकीस अडथळा; स्थलांतरीत करण्याची मागणी!

 

( उमेश ईटणारे )
मलकापूर :- शहरातील बस स्थानकासमोर बुलढाणा रोडवर उभारण्यात आलेला हायमास्ट लाईट पोल सध्या वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरत आहे. रस्ता आधीच अरुंद आणि मुख्य वाहतूकमार्ग असल्याने मोठ्या वाहनांच्या वळणावेळी अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने परिसर अधिक प्रकाशमान व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी हा हायमास्ट पोल उभारला होता. मात्र प्रत्यक्ष वापरात एसटी बस स्थानकातून बाहेर पडताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वेळा यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते. नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलचे तांत्रिक पुनर्मूल्यांकन करून तो रस्त्याच्या कडेला किंवा अधिक सुरक्षित जागी हलविल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल. विशेषतः आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा राहणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या वाढत्या वाहतुकीचा विचार करून नियोजनबद्ध पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने या संदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योग्य निर्णय घेतल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!