मलकापूर :- शहरातील हनुमाननगर परिसरात कौटुंबिक वादातून २८ वर्षीय विवाहितेवर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार, शुभांगी विनोद मोरे (वय २८) यांच्या घरी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपी विनोद रमेश मोरे यांनी त्यांना मारहाण केली, तर दीपक रमेश मोरे यांनी लाकडी काठीने वार केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत शुभांगी मोरे जखमी झाल्या. तसेच रुपाली योगेश मोरे आणि स्वाती दीपक मोरे यांनी शिवीगाळ करत धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
