मेहकर :- तालुक्यातील दुसरबीडजवळ मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून तो काही क्षणांतच जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील चालक रोहित कुमार हा यूपी ६५ आरडी २१४० क्रमांकाच्या ट्रकमधून बनारस येथून नाशिकच्या दिशेने इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या घेऊन निघाला होता. सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास दुसरबीड परिसरातील चॅनेल क्रमांक ३१२ जवळ ट्रकमधून धूर निघू लागल्याचे त्याच्या लक्षात आले.
धूर दिसताच चालकाने तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला; मात्र काही वेळातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सहायक पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. तसेच समृद्धी महामार्गावरील व मेहकर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.