नांदुरा : शहरातील वार्ड क्रं. एक मधिल लक्ष्मी नगर भागात दोन ठिकाणी घरफोड्या होवून चोरट्यांनी १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दोन ऑगस्टच्या रात्री घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी नगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय ५० हे 2 ऑगस्टच्या रात्री त्यांचे मोटरसायकलचे गॅरेज बंद करून त्यांच्या राहत्या घरी झोपले असता अज्ञात चोरट्यांने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले नगदी ६० हजार रुपये, एक दोन ग्रॅमची अंगठी कींमत ६ हजार व ४ ग्रॅमचे कानातील टॉप्स कींमत ८ हजार रुपये असे चोरुन नेले. तर साबे यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या उमेश हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातील सोन्याचे दागिने व नगदी ३ हजार रुपये असा एकूण एक लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी गुणवंत साबे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३३१ (४), ३०५ (अ) ६२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.