किरकोळ वादातून काका-भाच्यावर सळईने हल्ला; तिघांवर गुन्हा, घाटपुरी येथील घटना!

खामगाव :- येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटपुरी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणासह त्याच्या काकावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गणेश हरसिंग सोळंके (वय ३३) यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. त्यांच्या भाच्याने शेजारील मुलीशी संवाद साधल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी भाच्याला मारहाण सुरू केली. भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या काकांनाही आरोपींनी लक्ष्य करत लाठी-काठ्या आणि लोखंडी सळईच्या साहाय्याने दोघांवर हल्ला केला. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी १० एप्रिल रोजी पहाटे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार एका अल्पवयीन आरोपीसह कमलेश तांदळे (वय २१) आणि पृथ्वीराज थोरात (वय १८, सर्व रा. पोस्टमन कॉलनी, घाटपुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!