देऊळगाव कुंडपाळ येथे गोशाळेत बिबट्याचा शिरकाव; गायीचा मृत्यू, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

देऊळगाव कुंडपाळ : – लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्प परिसरातील पांडुरंग गोसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एका गायीचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. गोशाळेत सुमारे ७० गायी व दोन बैल बांधलेले होते. त्यापैकी पाच गायी दुभत्या असून वासरे शेजारील जागेत ठेवण्यात आली होती. रविवारी (दि. २१) सकाळी गोशाळेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक नारायणराव आडे हे गुराख्यासह गोशाळेत आले असता गायीचा मृतदेह आढळून आला आणि प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनपाल चौधरी व फुके यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली. परिसरात अलीकडच्या काळात बिबट्याच्या हालचाली वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. मागील महिन्यातही एका शेतकऱ्याच्या गोठ्यात अशाच प्रकारचा हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!