पहूरजिरा येथील एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

जलंब : तालुक्यातील पहूरजिरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कृत्य करत एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी करून तब्बल ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील पहूरजिरा ता. शेगाव येथे दोन अज्ञात चोरट्यांनी संगनमताने गावात प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम सिताराम नारायण कोंडे (वय ७०) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्या वेळी घरात असलेल्या कोंडे व त्यांच्या पत्नीला धमकावत कपाटातील ३० हजार रुपये रोख रक्कम तसेच पत्नीच्या अंगावरील चांदीच्या पाटल्या किंमत सुमारे २० हजार रुपये आणि बेन्टेक्स धातूचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. यानंतर चोरट्यांनी गावातीलच महादेव रामदास वाशिमकार यांच्या घरात घुसून कपाटातील २२ हजार ४०० रुपये, तसेच सुनील चंद्रभान सुरडकार यांच्या घरातील कपाटातून २२ हजार ७०० रुपये अशी रोख रक्कम चोरून नेली. या तिन्ही घरांमधून मिळून ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी झाल्याने पहूरजिरा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
याप्रकरणी सिताराम नारायण कोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध अप. क्र. ११३/२०२६ अन्वये
भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(४), ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जलंब पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!