मेरा बु.:- अंढेरा गावात शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या हक्कावरून सुरू झालेला वाद चिघळत थेट घरासमोर येऊन मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रल्हाद नागरे (वय ४५) या १२ एप्रिल रोजी घरी परतत असताना रामा प्रल्हाद केदार यांच्या शेतातून जात होत्या. यावेळी “या रस्त्याने येऊ नका” असे सांगत आरोपींकडून त्यांना अडवण्यात आले. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला व शिवीगाळ करण्यात आली. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन संगीता नागरे व त्यांच्या पतीवर चापट-बुक्क्यांनी हल्ला केला. तसेच भाग्यश्री रामा केदार व चंद्रभागा प्रल्हाद केदार यांनीही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात संजू राघू केदार, वंदना रमेश केदार, भाग्यश्री रामा केदार, चंद्रभागा प्रल्हाद केदार, रमेश सखाराम नागरे व रामा प्रल्हाद केदार (सर्व रा. अंढेरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.