मलकापूर : जागा व पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये ओढाताण व लोंबाझोंबी झाल्याची घटना शहरातील भ्रातृमंडळ चाळीसबिघा परिसरात घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पाच जणांसह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष दिलीप पेंढारकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास भ्रातृमंडळ चाळीसबिघा परिसरात जागा व पैशांच्या वादावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी एकमेकांशी ओढाताण करीत लोंबाझोंबी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी मनोहर किणगे (वय ६०), सतीष राजपूत (वय ५८), दिग्वीजयसिंग राजपूत (वय २६), अमोल राजपूत (वय ३५) सर्व रा. दाताळा तसेच अतुल किणगे (वय ५५) रा. शिरढोण यांच्यासह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. २४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १९४ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र दळवी करीत आहेत.