मोताळा : बुलढाणा – मलकापूर रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (१० एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत तरुणाचे नाव सचिन हनुमान तिवारी (रा. राजूर) असे असून पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजूर येथील सचिन तिवारी, पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे तिघे एमएच २८ बीएम ७१९३ क्रमांकाच्या दुचाकीने दवाखान्याच्या कामासाठी मोताळा येथे जात होते. दरम्यान, त्यांनी मार्गात त्रिमूर्ती पेट्रोलपंपावर थांबून पेट्रोल भरले. त्यानंतर काही अंतर पुढे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला कट मारल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सचिन तिवारी गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र कपले, हेकाँ. प्रवीण पडोळ, बळीराम खंडागळे, रमेश नरोटे, श्रीकांत चिंचोले, रविंद्र नरोटे, प्रमोद साळोक व मनोहर पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास बोराखेडी पोलिसांकडून सुरू आहे.