शेगाव : पतीसोबत उपचारासाठी आलेल्या महिलेचा रस्त्यात अश्लील प्रस्ताव देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. ‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत… चल आपण शेगावला एन्जॉय करू’ असे म्हणत आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. १ एप्रिल रोजी ती आपल्या पतीसह शेगाव येथे उपचारासाठी आली होती. उपचार आटोपल्यानंतर दोघेही घरी परतत असताना महिला मित्राच्या मोटारसायकलवरून पुढे निघाली. मात्र मोटारसायकलची चावी पतीकडे राहिल्यामुळे ती गावाजवळील फाट्यावर उतरून थांबली होती. याच वेळी आरोपी रतन सुरेश दाभाडे (रा. पाडसूळ, ता. शेगाव) हा मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने महिलेला अश्लील प्रस्ताव देत तिचा हात पकडला व नको त्या प्रकारे विनयभंग केला. दरम्यान, पीडितेचे पती आणि एक साक्षीदार घटनास्थळी पोहोचले असता पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. यावर आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४, ७५, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.