बुलढाणा : – देऊळघाट मार्गावर मंगळवारी सायंकाळी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातावेळी वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट येथील गोविंदा पसरटे हे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणारे वाहन चालवितात. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता ते विद्यार्थ्यांना घेऊन देऊळघाटकडे परतत असताना एका हॉटेलजवळ त्यांच्या वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले, तर दुचाकी रस्त्याबाहेर फेकली गेली.
या अपघातात दुचाकीस्वार शेख तौसिफ शेख युसुफ (वय ३८, रा. शेंदुर्णी, जि. जळगाव) व रियाज बेग जफर बेग (वय ३८, रा. देऊळघाट) हे गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान शेख तौसिफ यांचा मृत्यू झाला. रियाज बेग यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, चारचाकीतील रोशनी पसरटे (९), महेश कानडे (११), अथर्व कटक (६) व शेजल कटक (१४) हे विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवि राठोड यांनी घटनास्थळी भेट देत चालकाला ताब्यात घेतले. मद्यप्राशनाच्या संशयावरून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
