मलकापूर :- दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे भारताचे महान कृषितज्ञ आणि शेतकऱ्यांचे नेते डॉ. पंजाबराव देशमुख यांची 126 वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या सोहळ्यात भारताचे माजी पंतप्रधान आणि नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे देशासाठी केलेले बहुमूल्य योगदान स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. आपल्या अभिवादनपर भाषणात प्राचार्य यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल, विशेषतः कृषी क्षेत्रातील त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल प्रकाश टाकला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी क्षेत्रातील डॉ. देशमुख यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती देत, आधुनिक भारतात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर जोर दिला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, प्रा. साकेत, प्रा. राजेश सरोदे, प्रा. दीपक जावरे, प्रा. तेजल खर्चे, प्रा. भाग्यश्री नारखडे, प्रा. ऋतुजा पाटील, प्रा. कैलास कोळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री रमाकांत राणे, बलदेव राजपूत, श्री शरद पाटील, सचिन शेलार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारीत प्रेरणादायी अनुभव ऐकत आपापल्या शंका मांडल्या व त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशाला मिळालेल्या जागतिक ओळखीचा उल्लेख करण्यात आला. त्यांची शांततापूर्ण नेतृत्वशैली व देशहितासाठी केलेल्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ. मनमोहन सिंह यांचे स्मरण करून देशसेवेसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला.