Headlines

मलकापूरकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा दिवसांचा लागू शकतो कालावधी, वीजपुरवठा खंडित झाल्याने मलकापूरकरांवर जल संकट

मलकापूर (प्रतिनिधी) – पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाण्याची उचल व जलशुध्दीकरण केंद्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी मलकापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या धुपेश्वर येथील पंपिंग स्टेशनला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून उच्चदाब विद्युत पुरवठा करण्यात येतो; परंतु २६ मे च्या वादळी वार्‍याने कुंड ते हरसोडापर्यंतचे जवळपास ३० ते ४० विद्युत खांब वाकलेले आहेत. विद्युत पुरवठा सुरू करण्याकरिता अंदाजे २ ते ३ दिवस लागणार असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यामुळे धुपेश्वर येथील विद्युतपुरवठा २६ मे पासून पूर्णतः बंद आहे. मलकापूर शहराकरिता लागणार्‍या पाण्याची उचल तापी-पूर्णा नदीवरील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमधून करण्यात येते; परंतु धुपेश्वर येथील विद्युतपुरवठा खंडित झालेला असल्याने धुपेश्वर येथील पंप बंद आहे. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत शहरास पाणीपुरवठा करणे शक्य नाही.
धुपेश्वर येथील विद्युतपुरवठा सुरळीत सुरु झाल्यानंतरही शहराच्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता अंदाजे १० ते १२ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे, तसेच पंपाचे हेड वाढल्यामुळे पंपाच्या डिचार्जवरही परिणाम झालेला आहे. यातच परत विद्युतपुरवठा खंडित झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास पाणी वाटपाचे वेळापत्रक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *