मलकापूर – दिनांक 3 जुलै 2024 मलकापूर पंचक्रोशीतील गाजलेल्या शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे यांचा जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर यांनी फेटाळला आहे.
याबाबत अधिकृत असे की मलकापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना जास्त भावाने कापूस खरेदी करण्याचे आमिष देऊन कापूस खरेदी केला व त्याचे कापूस खरेदीचे रकमेचा परतावा दिला नाही म्हणून आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांचेकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६००/२०२३ नुसार दाखल झाला होता. त्यामध्ये आरोपी जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन याचे विरुद्ध व त्याचे सहकारी यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420 406 120 ब आणि 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आली होती.
सदरचे गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी करून विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्यासमोर दोषारोप पत्र दाखल केले आहे दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपी यांनी त्याचा जामीन अर्ज विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्यासमोर केला होता. विद्यमान न्यायदंडाधिकारी श्री एस ए कुलकर्णी यांनी आरोपी जगन उर्फ जग्गू डॉन याचा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपीने विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापूर यांचे समोर जामीन अर्ज क्रमांक १६०/२०२४ नुसार दाखल केला होता. सदरची जामीन अर्जावर दिनांक ०२/०७/२०२४ रोजी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. व्ही. पोतदार यांचे समोर सुनावणी झाली. सदरचे सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील श्री विवेक मा बापट व आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी श्री अपसुंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज खारीज करण्यात आल्याचा आदेश दिनांक ०३/०७/२०२४ रोजी विद्यमान न्यायाधीश श्री. एस. व्ही. पोतदार यांनी पारित केला आहे.