मोताळा : शेतमोजणीच्या वादातून एकास दगडाने व बुक्क्यांनी मारहाण करून रुमालाने गळ्याला फास लावत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी सुलतानपूर शिवारात घडली होती. याप्रकरणी १२ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कोथळी येथील किशोर तुळशीराम पाटील यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मे रोजी दुपारी गावातीलच शेतशेजारी दामोदर समाधान सातव, सुधाकर समाधान सातव, गोपाल सुधाकर सातव, मनीष सुधाकर सातव आणि राहुल दामोदर सातव यांच्या शेताची सरकारी शेतमोजणी असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी विनोद देशमुख यांनी फोनद्वारे फिर्यादी किशोर पाटील यांना कळविले होते. तुमच्या शेतशेजारी गट क्र. ४९ ची शेतमोजणी असल्याने – तुम्ही शेतात या, असेही त्यांना सांगितले होते. दरम्यान, फिर्यादी हे शेतात गेले असता भूमी अभिलेख कर्मचारी यांनी तुमचे शेत मोजायला आलो, असे सांगितले. त्यांच्याशी बोलत असताना दामोदर सातव, सुधाकर सातव, गोपाल सातव, मनीष सातव आणि राहुल सातव यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस दगडाने तथा बुक्क्यांनी मारहाण करीत अश्लील शिवीगाळ करून रुमालाने गळ्याला फास लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाच्या १२ जून रोजी किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाये आणि पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चिंचोले हे करीत आहेत.