मलकापूर ( दिपक इटणारे ):- मलकापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून सतत चोरीच्या घटना घडत आहेत. कधी दिवसाढवळ्या दुचाकीवरून बॅग पळून नेल्या जाते तर रात्रीही घर फोडींच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये बस स्थानक चोरट्यांचा माहेरघर बनले होते तर आता चक्क मलकापूरच चोरट्यांचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. मात्र यामध्ये विशेष असे की घरफोडी व दुचाकीवरून होणाऱ्या चोऱ्यांपैकी आता पर्यंत एकही चोर पकडल्या गेला नसल्याची माहिती आहे. काल बन्सीलाल नगर रोड वर असलेल्या गणपती मंदिरामध्ये भामट्या चोराने चक्क ऍम्प्लिफायर चोरून लाजच सोडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे शहरातील बन्सीलाल नगर रोड नजीक असलेल्या गणपती मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने मंदिरातील ऍम्प्लिफायर चोरून नेल्याची घटना काल दिनांक 23 जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. काही नागरिकांना मंदिरात जाऊन बघितले परंतु ऍम्प्लिफायर दिसत नसल्याने कोणीतरी चोरून नेल्याचा संशय त्यांना आला. मात्र सीसीटीव्ही कॅमेरा बघितल्या नंतर कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या बाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिक भयभयित झाले असून पोलिसांच्या हाती चोरटे लागत नसल्याने ही मलकापूर वासियांची शोकांतिकाच आहे