मलकापूर:- एकीकडे हनुमंताची आरती सुरू, आरती सुरू असताना मंदिरात असलेल्या घंट्यांच्या आवाजाने शेजारीच असलेल्या हिरव्या झुडपांमध्ये चक्क तीन सर्प एकमेकांसोबत डोलत असतांनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतो आहे. या सर्पांना बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मलकापूर ग्रामीण भागात येत असलेल्या गाडेगाव मंदिर परिसरामध्ये जागृत हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज सकाळी व सायंकाळी हनुमंताची आरती होत असते. दि.21 जुन रोजी सायंकाळच्या सुमारास हनुमंताची आरती सुरू असतांना मंदिरा शेजारीच असलेल्या झुडपांमध्ये तीन सर्प एकमेकांसोबत खेळत असतांना हनुमान भक्तांच्या निदर्शनास पडले. जसा जसा आरतीमध्ये घंट्यांचा आवाज होत होता तसे तसे सर्प डोलत होते. घंटा बंद केल्यानंतर तिन्ही सर्प झूडपांमध्ये गेले मात्र पुन्हा आरतीतील घंटा सुरू झाल्यानंतर तिन्ही सर्प पुन्हा मंदिरातील घंटांच्या आवाजावर डोलायला लागले. या सर्पांची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी त्याठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आरतीतील घंटा बंद झाल्यानंतर पुन्हा तिन्ही सर्प हिरव्या झुडपांमध्ये निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरामध्ये कैद केला.मात्र आता तो व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच वायरल होत आहे.