बुलढाणा : बुलढाणा तालुक्यांतील एका अल्पवयीन मुलीने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली ही घटना १० जुलै रोजी बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत परीसरात घडली. मृत मुलीचे नाव कोमल संदीप सुसर असे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील संदीप सुसर हे मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरात राहतात. त्यांची कोमल ही मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. कोमलने शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिकवणी क्लास लावलेला आहे. या खासगी क्लासचा पेपर ९ जुलै रोजी झाला. यामध्ये तिला कमी गुण मिळाले होते. १० जुलै रोजी ती बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. अखेर वाड्यातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी रामदास सुसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.