चिखली :- दहा वर्षीय चिमुकल्याचा आतेभावानेच खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील अंबाशी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.दि २२ जुलैला अरहानचे अपहरण झाले असल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले होते की अरहान हा सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी अरहान उशिरापर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला होता.मात्र अरहान कुठेही मिळून आला नाही, याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान काल 23 जुलै रोजी अरहानचा खून हा त्याच्या सख्ख्या आतेभावानेच केला असल्याची माहिती समोर आली आहे. शेख अन्सार (२२) असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच राहणारा आहे. शेख अन्सार याने मामेभाऊ अरहानचा दोरीने गळा आवळून खून केला, त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकला आणि घराशेजारच्या शेणाच्या उकिरड्यात पुरला, सख्ख्या मामे भावाचा अशा निर्दयतीने खून का केला असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दहा वर्षीय चिमुकल्याने असे काय केले की आते भावाने त्याचा खूनच केला? खुनाचे नेमके कारण काय हे पोलीस तपासात समोर येणार आहे.