चिखली:- तालुक्यात ११ जूनच्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यावर झोपलेली अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसाट्याचा वारा सुटल्याने घरावरील टिनपत्र्यांसह लोखंडी अँगल व त्याला बांधलेला झोका उडून सुमारे २०० फूट अंतरावर पडल्याने झोक्यात झोपलेल्या चिमुकलीचा अंत झाला आहे. सई भरत साखरे असे या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या चिमुकलीचे नाव आहे. ११ जूनच्या सायंकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या पावसाने तालुक्याला झोडपले. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावाला बसला. वादळी वाऱ्यामुळे येथील भरत मधुकर साखरे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. याच टिनपत्र्यांसाठी लावलेल्या लोखंडी अँगलला झोका बांधलेला होता व त्यात अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली सई झोपलेली होती. टिनपत्रे उडून जाताना त्यासोबत लोखंडी अँगल व त्यास बांधलेला झोका देखील उडून गेला व सुमारे २०० फूट अंतरावर चिमुकली झोक्यावरून जमिनीवर आदळली. तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी सोनुने, तलाठी राठोड, अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पाटील आदी रात्रीच गावात दाखल होते. त्यांनी मदत कार्य पुरविण्यासह नुकसानीची माहिती घेतली. तर दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदार खाडे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. १२ जून रोजी उशिरापर्यंत नुकसानीचे पंचनामे सुरू होते. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, साखरखेर्डा, देऊळगाव राजा तालुक्यासह डोणगाव परिसरातही गेल्या दोन ते तीन दिवसापासून वादळी पाऊस होत आहे. यामुळे साखरखेर्डा परिसरात ९ जून पासून विजेचा लंपडाव सुरू आहे. दुसरीकडे डोणगावमध्येही पावर स्टेशनवर वीज पडल्याने डोणगावसह परिसरातील १२ गावांचा ११ जून रोजी वीज पुरवठा खंडीत होता.