मोताळा: तालुक्यातील शेलापूर येथील मोताळा ते मलकापूर मार्गावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्या ३० जुन्या वापरत्या पाण्याच्या मोटारी लंपास केल्याची घटना २१ जून रोजी सकाळी उघडकीस आली. प्रकरणी २५ जून रोजी बोराखेडी पोलीसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चिराग प्रकाश होले यांचे शेलापूर येथील बस थांब्याजवळ मोताळा ते मलकापूर मार्गावर मोटार दुरुस्तीचे दुकान आहे. २० जून रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास चिराग होले यांनी दुकान बंद करून घरी आले होते. मात्र २१ जून रोजी नेहमी प्रमाणे दुकान उघडण्यासाठी ते गेले असता अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडलेले दिसलें त्यांना चोरी झाल्याचा संशय आला त्यांनी दुकानामध्ये जाऊन पाहिले असता जुन्या वापराच्या पाण्याच्या मोटारी चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी २५ जून रोजी चिराग होले यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास गायकवाड हे करीत आहेत.