मलकापूर: – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. धरणगाव येथील करुणा बुद्ध विहार संस्थेच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व समर्पित योगदानाची दखल घेऊन त्यांना हा बहुमान देण्यात आला.
प्रा. चौधरी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले असून, शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेला पुढाकार विशेष उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेल्या कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, सामाजिक जागृती मोहिमा, तसेच शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी केल्यामुळे त्यांचं कार्य व्यापक स्तरावर पोहोचले आहे. त्यांनी कॉलेजमध्ये गुणवत्ता सुधारणा, नवोपक्रम, व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध उपक्रमांना चालना दिली आहे.
या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांचे नेतृत्व, तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील व सचिव डॉ. अरविंद कोलते यांचे प्रेरणादायी पाठबळ मोलाचे ठरले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच प्रा. चौधरी यांना आपल्या कार्याला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत झाली.
सन्मान प्रदान सोहळ्याला महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रा. पांडुरंग चोपडे उपस्थित होते. त्यांनीही चौधरी सरांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा सन्मान म्हणजे केवळ एक गौरवच नव्हे, तर प्रा. रामकांत चौधरी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, या प्रेरणादायी सन्मानामुळे त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.