शेगाव : – शेतीचे अकृषक प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिव्हील इंजिनिअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीला आज, ८ मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडून करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा नगररचना विभागामार्फत शेतीचे अकृषक प्रकरण मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ७५ हजारांची लाच मागण्यात आली होती. हे प्रकरण सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. विमल दिनकरराव रायपुरे यांच्याशी संबंधित आहे.
आरोपी प्रशांत महादेव बानोले (रा. शेगाव) याने ही रक्कम रायपुरे यांच्या मुरारका कॉलेज रोडवरील चंद्रलोक सोसायटी येथील घरी स्वीकारली असताना, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले.या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रमेश पवार करीत आहेत.
शेती अकृषक प्रकरण मंजुरीसाठी ७५ हजारांची लाच घेताना सिव्हील इंजिनिअर रंगेहात पकडला! बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
