सिंदखेडराजा : येथील वृद्ध महिला देव दर्शनासाठी नातवा सोबत खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या असतांनाच त्यांच्या गळ्याला चाकू लाऊन दीड लाखाचे दागिने चोरट्याने लांपास केले आहे.
सिंदखेडराजा येथील ६५ वर्षीय वृद्ध सुमनबाई मेहेत्रे ह्या आपल्या नातवाला घेऊन पांगरखेड रोडवरील खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी सकाळी सातच्या दरम्यान जात होत्या. दरम्यान खंडोबा रोडवरील नदीजवळ दुचाकीवरून दोन तरुण आले आणि वृध्देच्या गळ्याला चाकू लावला व या वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दीड लाखाचे दागिने लुटून नेले. घटनेची माहिती मिळताच सिं. राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन तपासाचे चक्र फिरवले व त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज घेऊन आरोपीचा शोध घेण्यात आला. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये ३०९ (४), ३५१ (३), ३(५) भारतीय न्याय संहिता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी सानप करत आहे.