Headlines

नूतन विद्यालयातील दोन शिक्षक निलंबित — गंभीर गुन्ह्यात अटकेनंतर शिक्षण विभागाची तातडीची कारवाई

मलकापूर::- शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीच्या भूमिकेत असताना अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आल्यास कायदेशीर कार्यवाही अटळ ठरते, याचे उदाहरण मलकापूरच्या नूतन माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. समाधान आत्माराम इंगळे व श्री. अनिल नीना थाटे या दोघांना एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये अ.प.के. २६९/२०२५ अंतर्गत कलम ६४ (२)(१), ७० (१), ३५१ (२) व ३(५) बिएनएस नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली असून, २२ एप्रिल ते ७ मे २०२५ या कालावधीत ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ३३ (५) नुसार, ४८ तासांपेक्षा अधिक कोठडीत राहिल्यास निलंबन अनिवार्य ठरते. या आधारावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी दिनांक २८ एप्रिल रोजी पत्र क्रमांक बुजिप/शिमा/शिक्षक/१७४८/२०२५ अन्वये निलंबनास मान्यता दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आधारे दोन्ही शिक्षकांना निलंबित केले असून, ही कारवाई लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षांना कळवण्यात आली आहे.
निलंबन आदेशानुसार, पुढील आदेश होईपर्यंत दोघेही सहाय्यक शिक्षक पदावरून दूर राहतील. निलंबनाच्या कालावधीत राजीनामा, अन्य नोकरी, मुख्यालय बदल आणि वेतन यासंबंधी कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत. दोषमुक्तीचा कागदोपत्री पुरावा दिल्यानंतरच पुन्हा सेवेत रुजू होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या प्रकरणामुळे शहरात व शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, पालक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांसारख्या आदर्श व्यक्तींनी गुन्हेगारी प्रकरणात अडकणे दुर्दैवी व निंदनीय असल्याचे मत बहुसंख्यांनी व्यक्त केले आहे.
शाळेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत असून, जिल्हा शिक्षण विभागाने अमरावती विभागातील शिक्षण उपसंचालक व वेतन पथकाला या घटनेची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!