मलकापूर: आज (24 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घुसर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. काळी पिवळी प्रवासी वाहन (एम एच 28 एच 1077) व स्विफ्ट चारचाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात काळी पिवळी वाहनातील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून स्विफ्ट वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की काळी पिवळी प्रवासी वाहन बुलढाण्यावरून मलकापूरकडे 12 ते 15 प्रवासी घेऊन येत होती. त्याचवेळी स्विफ्ट चारचाकी वाहन मलकापूरहून बुलढाण्याकडे जात असताना घुसर फाट्याजवळ या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात काळी पिवळी वाहनातील ममता सैनी (वय 25) आणि नचुराम भिंडा (वय 30), राहणार राजस्थान, हे किरकोळ जखमी झाले आहेत. स्विफ्ट वाहनाचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला तातडीने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
काळी पिवळी वाहनात एकूण 12 ते 15 प्रवासी होते. सुदैवाने, अपघातात फक्त दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. घटनास्थळावरून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.