शेगाव : शहरातील बस डेपो परिसरात बस चालकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका स्वच्छक कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन गणेशराव सनगाळे (वय ३९, व्यवसाय बस चालक, शेगाव आगार) हे ३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अडसना रोडवरील बस डेपोतील वाहन परीक्षक कक्षात बसले होते. त्यावेळी प्रमोद गणपत पोहरे (रा. रोकडीयानगर, शेगाव) हा स्वच्छक कर्मचारी तेथे आला व त्याने फिर्यादीला उद्देशून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याला शिवीगाळ करू नये तसेच त्या ठिकाणी त्याचे काही काम नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपीने फिर्यादीला ढकलून देत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या ड्युटीवरील वाहनाचे ब्रेक फेल करण्याची तसेच शेगाव येथे ड्युटी करू देणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप. क्र. २०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.