Headlines

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याचे संकेत; भावी नगरसेवक लंगोट बांधून मैदानात उतरायला सज्ज

मलकापूर( दिपक इटणारे ):- गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. निवडणुका आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने भावी नगरसेवकांची ‘साखरझोप’ भंग पावली आहे. जे नवखे, गवशे, आणि हवशे गेली तीन वर्षे गप्प बसले होते, ते आता पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत.

मागील वर्षी निवडणुका तातडीने लागतील, या अपेक्षेने काही उत्साही भावी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांच्या लग्नांपासून अंत्यविधीपर्यंत, मरणधरणाच्या प्रसंगांपर्यंत हजेरी लावून समाजसेवेचे ढोंग केले होते. त्यांचे खास “हात ओळख” करणारे कार्यक्रमही गाजले होते. त्यातच गरजू कार्यकर्त्यांवर पैसे उधळून त्यांनी ‘प्रचार मोहीम’ सुरू केली होती. मात्र, निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने अनेकांचे धंदे बसले आणि “कार्यकर्ता विकत घेणे” हेही तोट्याचे ठरले.

आता पुन्हा निवडणुका होणार असल्याच्या चर्चेमुळे हेच भावी नगरसेवक बाहेर पडू लागले आहेत. पूर्वी गप्प बसलेले हे ‘जनसेवक’ आता अचानक मतदारांना विचारपूस करताना, एखाद्या सोहळ्यात मदतीचा हात देताना दिसू लागले आहेत. काहींच्या तर घरच्या उंबऱ्यावर डबे पोहोचवायचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.

गमतीचा भाग म्हणजे, या “सेवकां”ची मूळ प्रेरणा समाजसेवा नसून फक्त तिकिटासाठीची चढाओढ आहे. काहींनी आपले फोटो फुगे, बॅनर, कॅलेंडरवर छापून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण मतदारही आता हुशार झाले आहेत. ते या “हाताळी”पणाला प्रतिसाद देणार की नाही, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

भावी नगरसेवकांची ही नाट्यमय हालचाल पाहून नागरिकही मिश्किल टिप्पणी करत आहेत, “निवडणुका झाल्या तर बरं, नाहीतर हे पुन्हा गप्प बसतील!” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हा ‘राजकीय तमाशा’ काही दिवस रंगणार, हे निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!