आईशी शेवटचा संवाद… आणि समोरच उडी; ३९ वर्षीय युवकाची हृदयद्रावक आत्महत्या

चांडोळ (ता. बुलढाणा) : आईला “हा आपला शेवटचा संवाद आहे” असे फोनवर सांगितल्यानंतर काही क्षणांतच आई-भावाच्या डोळ्यादेखत आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन ३९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धाड ता. बुलढाणा येथील रहिवासी ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) यांची धाड येथील भाग क्रमांक-१, गट क्र. ५७ मध्ये शेती आहे. सोमवार, २ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या आईला मोबाईलवर फोन करून हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. मुलाच्या आवाजातील गंभीरता ओळखून आईला काहीतरी अनर्थ घडणार असल्याची जाणीव झाली. आईने तातडीने भावाला घेऊन शेताच्या दिशेने धाव घेतली. दोघे शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा मोबाईल अजूनही सुरूच होता. आई आणि भाऊ समोरून येताना दिसताच ज्ञानेश्वर यांनी फोन चालू असतानाच आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत उडी मारली. काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. आई-भावाच्या डोळ्यादेखत घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रघुनाथ सपकाळ यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर सपकाळ यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!