सोनाळा (टूनकी) :- शिवारातील एका संत्रा बागेत ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता साडेचार वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचे वडील हे शेतात रखवालदार म्हणून कार्यरत आहेत. याच दरम्यान मध्यप्रदेशातील डोईफोडीया येथील २१ वर्षीय सुनिल कालूसिंग निगवाले हा युवक त्या भागात आला होता. त्याने बालिकेला संत्रा बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. सोनाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. ६ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीस कठोर शासन व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.