बहिणीला अखेरचा निरोप दिल्यानंतर भावाचाही मृत्यू; साखरखेर्ड्यात हृदयद्रावक घटना

साखरखेर्डा :- बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून तिला अखेरचा निरोप दिल्यानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साखरखेर्डा येथे घडली. या दुहेरी आघातामुळे सुरळकर आणि ढोबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साखरखेर्डा येथील शशिकला सुरळकर (वय 80) यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 12 मार्च रोजी साखरखेर्डा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अंत्यसंस्कारासाठी यवतमाळ येथून आलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही उपस्थित होते. बहिणीला अखेरचा निरोप देऊन सर्वजण घरी परतले असताना राम ढोबळे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, राम ढोबळे यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी यवतमाळ येथे नेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!