Headlines

कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा ऑटो चालकाकडून छळ; गुन्हा दाखल

अकोट: अकोट शहरात कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा ऑटो चालकाकडून छळ आणि विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोनू चौक परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी आरोपी शे. इर्शाद शे. अन्वर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून ऑटो चालकाच्या त्रासाला सामोरी जात होती. कॉलेजला जात असताना आरोपी मुलीचा सतत पाठलाग करत होता व वाईट उद्देशाने त्रास देत होता. १८ डिसेंबरला सोनू चौक येथे त्याने मुलीला थांबवून बोलण्याचा आग्रह केला. मुलीने विरोध केल्यावर आरोपीने जातिवाचक शिवीगाळ करत धमकी दिली आणि तिचा हात पकडला.

मुलीने ही घटना तिच्या पालकांना सांगितल्यानंतर १७ डिसेंबर रोजी तिच्या वडिलांनी आरोपीला समज दिली होती. मात्र, त्यावर कोणताही परिणाम झाला नाही. अखेर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी शे. इर्शाद याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये ७८, ३५१, ३५२, ८, १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांचा समावेश आहे.

सध्या अकोट शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!