शेगाव:- शेगाव येथे ऑटोत सवाऱ्या घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन चाकूने हल्ला झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात ऑटोचालक व त्याचा भाऊ जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. फिर्यादी गणेश श्रीराम बावस्कर (३०, रा. संविधान चौक, शेगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या सुमारास त्यांनी पाच सवाऱ्यांना आनंद विसावा येथे सोडले. त्यानंतर ऑटोवाले मित्रासोबत बोलत असताना विठ्ठल त्र्यंबक बुडुकले व सचिन हिवरे (दोघे रा. दसरानगर) त्यांच्या जवळ आले. त्या वेळी विठ्ठलने गणेशला शिवीगाळ करत खिशातून चाकू काढून पोटावर व पाठीवर वार केला. घटनेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सचिन हिवरेने केला, मात्र विठ्ठल थांबत नव्हता. काही वेळाने फिर्यादीचा भाऊ संजय बावस्कर घटनास्थळी आला असता त्याच्यावरही विठ्ठलने चाकूने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात विठ्ठल त्र्यंबक बुडुकले याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १०९, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मसपोनि तांगडे करीत आहेत.