शेगाव:- आजच्या स्वार्थी युगातही काही माणसे आपली निःस्वार्थ वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने समाजात माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून देतात. अशीच एक प्रेरणादायी घटना शेगाव आगारात समोर आली असून, येथील महिला वाहक सौ. आरती केनेकर यांनी बसमध्ये विसरलेले दोन लाखांचे दागिने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ घातला आहे.
ही घटना शेगाव-तेल्हारा बस क्रमांक ९९६३मध्ये घडली. गौरी श्रीकांत जोशी (रा. जळगाव, खानदेश) या महिला प्रवाशाने तेल्हारा येथे उतरल्यानंतर लक्षात आले की, तिचे दोन लाखांचे दागिने बसमध्येच राहिले आहेत. तिने तातडीने तेल्हारा आगारात माहिती दिल्यानंतर शेगाव आगारप्रमुख संतोष दिवनाले यांनी सौ. आरती केनेकर यांच्याशी संपर्क साधला. केनेकर यांनी बसमधील सीट तपासून दागिने शोधून काढले आणि सदर महिला प्रवाशाला शेगाव येथे बोलावून दागिने सुपूर्द केले.
या प्रामाणिक कृत्यामुळे सौ. आरती केनेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळेच सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ होत असून, त्यांचे हे कार्य समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.